Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 32

निरपेक्ष प्रेम...

$
0
0

अध्यात्म ही विद्यांची विद्या आहे. अध्यात्मविचाराचा परिघ जितका विस्तीर्ण करू शकतो, तितका तो विस्तीर्ण होतो. अध्यात्माचा सैद्धांतिक विचार हा गहन होत जातो. आपल्याला अध्यात्माचा अर्थ साधायचा आहे. रोजचे जगणे हे विवेकाधिष्ठित केले की ते अध्यात्ममार्गी होते.

ईर्षा, मद, मोह, लोभ, माया, अहंकार या दुर्गुणांना आपल्या वर्तनातून हद्दपार केले की आपले जगणे निर्विष होते. निर्विकार होते. साध्या, भोळ्याभाबड्या, व्यक्तीच्या वर्तनातून अध्यात्माचा प्रत्यय येत असतो. आई आपल्या मुलावर प्रेम करते, त्यावेळी ज्या निर्व्याज प्रेमाचे दर्शन घडते तो अध्यात्माचा आविष्कार असतो. ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।ही साने गुरुजींची मनीषा अध्यात्मगर्भ आहे. प्रेममय जगणे हे आध्यात्मिक जगणे ठरते.

ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती।।हे जगद्गुरू तुकोबारायांचे उद्गार अध्यात्माचा संस्कार रुजविणारे आहेत. निरपेक्ष प्रेम करणे ही जगण्याची आवश्यक अट झाली की जगणे आपोआपच आध्यात्मिक होते. असा प्रेममय एकविध समाज निर्माण करण्यासाठी संतांनी आपले देह कष्टविले. आपल्या राष्ट्रीय थोर नेत्यांनी हीच कास धरली. . गांधीजींच्या समग्र कार्याचा पाया तर दुसऱ्याचे दुःख जाणणारा वैष्णव निर्माण करणे हा होता.

आपल्या समाजापाशी असे संचित असताना त्याच्याशी असलेली आपली नाळ आपण का तोडून घेतो याचाही आपण विचार करायला हवा. काही दिवस आपण असे सहचिंतन करणार आहोत. सहचिंतनाचा वारसा आपणास आपल्या ऋषींनी उपनिषदांतून दिलेला आहे. ‘सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै।सामूहिक कृती हे समाजाचे लक्षण असते. पण, समुहामुळेच अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समाजातच निर्माण होतो.

गुन्हेगारी समाजातच वाढते. समाजामध्ये मनमोकळा संवाद होऊ शकत नाही. संवाद सुरू झालाच तर चटकन त्याचे विसंवादात रूपांतर होते. विसंवादामुळे सर्व अनर्थ घडतात.

संवादासाठी भाषानामक अत्यंत उपयुक्त साधन मानवाने निर्माण केले. पण, या भाषेच्या साहाय्याने मानव सर्जनाची अनोखी सुंदर रूपे साकार करतो तशीच विकृत रूपेही आविष्कृत करतो. परिणामतः मानवी व्यक्तिमत्त्व दुभंगते. दुभंगलेले व्यक्तिमत्त्व सारासार विचार करू शकत नाही. सारासार विचार करणे म्हणजे विवेकाला तिलांजली देणे होय. अध्यात्माचा अर्थ धार्मिकतेशी जोडून जपजाप्य, कर्मकांडाशी वर्तन करणे असा घेतल्यामुळे अध्यात्माचा विराट परिघ अकारण संकुचित झाला आहे.

अध्यात्माच्या विराट परिघात मानवाने वावरणे म्हणजे स्वतःला विराट करणे होय. शतकामागून शतके जाऊनही मानवाचा अभिप्रेत विकास झालेला दिसत नाही; कारण मानवाचे विखंडीत व्यक्तिमत्त्व होय. White peruses Black. चांगल्याऐवजी वाईटाचा पाठपुरावा ही मानवी प्रवृत्ती त्यामुळेच संघटित होते.
- डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 32