Quantcast
Viewing latest article 4
Browse Latest Browse All 32

अजब रसायन

माणूस नावाचे रसायन अजब आहे. वितीएवढ्या पोटासाठी त्याला खूप बोभाटा करावा लागतो. पुरूषार्थाच्या त्याच्या तऱ्हेवाईक संकल्पनांमुळे तो अनेक रुपं धारण करतो. परस्परांवर विश्वास ठेवण्याइतकी विश्वासार्हता त्याच्या ठायी असतेच असे नाही. भावाभावातील प्रेममय संबंधाला भाऊबंदकीचा कलंक असतो. नणंद-भावजयीचं नातं विळ्या-भोपळ्याचं असावं, असा संकेतच रुढ झाला आहे. सासूसुनेच्या नात्याला सनातन वैराचं स्वरुप प्राप्त झालं आहे. चांगलं जगताच येऊ नये, अशा समाजव्यवस्थेत तो बिघडत जातो आणि बिघडलेल्या आपल्या रुपांना पैलू पाडत जगणं, त्याला अपरिहार्य वाटत जातं. आपण समभाव हरवून विषमभावाने जगतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. एक उदाहरण फार उद्बोधक आहे. एक मनुष्य आपल्या मुलाचं मुलीचं लग्न एकाच वर्षी उरकतो. ज्या गावाचा तो रहिवासी असतो, त्याच गावात तो आपल्या मुलीचं सासर पाहतो मुलाचीही सासुरवाडी गावातीलच निश्चित करून दोघांची लग्नकार्ये उरकून घेतो. पाच-सहा महिन्यांनंतर गावातीलच त्याचा एक मित्र गप्पागोष्टींच्या ओघात नवविवाहितांचे क्षेमकल्याण विचारतो. तो मनुष्य सांगतो, 'मुलीचं काय विचारता? आधीच ती खात्यापित्या घरात लहानाची मोठी झालेली आणि सासरही चांगलं नांदतं आहे. कसलीच ददात नाही.' एवढं असूनही सकाळ-संध्याका वेळ काढून आम्हा आई-वडिलांना दोनदा भेटून जाते.' सुनेचं कसं काय? असा प्रश्न मित्राने विचारल्यावर तो मनुष्य सांगतो. 'सूनेचं काय! तिला आमच्या घरात काहीच उणं नाही. सगळी चंगळ आहे. पोरगीही गुणाची आहे. फक्त तिचं एकच वाईट आहे. दिवसातून सकाळ-संध्याकाळ अशी दोनदा ती आई-वडिलांना भेटायला जातेच.' आपल्या मुलीचा जो सद्गुण तोच आपल्या सूनेचा मात्र दुर्गुण! हे माणसाचं विषमभावी वर्तन. 'दया करणे जे पुत्रासी। तेच दासा आणिक दासी' अशी अवस्था माणसाबाबत किती दूरवरची आहे, याची आपण कल्पना करू शकतो. माणसाच्या या विषमभावाचे अगदी आप्तस्वकीयांबाबत कसे दृष्टिकोन असतात, याचं बहिणाबाई चौधरी यांनी रुपकीय पद्धतीने काही स्फुट ओव्यांत वर्णन केले आहेः "माय म्हनता म्हनता ओठ ओठालागी भिडे। आत्या म्हनता म्हनता केवढं अंतर पडे।। तात म्हनता म्हनता जीभ दातामधे अडे। काका म्हनता म्हनता कसी मांगे मांगे दडे।। जीजी म्हणता म्हणता मिळे जिभले निवारा। सासू म्हणता म्हणता जाये तोंडातून वारा।।" व्यांतील पूर्वार्ध ममत्वसूचक तर उत्तरार्ध परत्वसूचक आहे. ज्या भाषेच्या साह्याने माणसांना परस्परांशी नात्यांच्या भावसुंदर धाग्यात बांधले त्या नात्यांच्या उच्चारणासाठी वागिन्द्रियांची जी स्थिती असते, ती ध्यानात घेऊन ध्वनिनिर्मिती आणि भावनिर्मिती यांचा प्रतिभापूरित प्रत्यय आणून दिला आहे. माणसाचे द्विदल जगणे, द्विपरिणामी जगणे लौकिक-अलौकिकाच्या द्वंदाचा प्रत्यय आणून देते. लौकिकाच्या बाजूकडेच अर्थात लंबक झुकलेला असतो. म्हणून जगणे विषमभावी गणले जाते.
- डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 4
Browse Latest Browse All 32


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>