Quantcast
Viewing latest article 11
Browse Latest Browse All 32

‘मना पाहिजे अंकुश’

माणूस हा सुखात्म प्राणी आहे की शोकात्म प्राणी आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो दोन्हीही आहे, हे उत्तर येते आणि ते बरोबरही आहे. सुखाच्या त्याच्या कल्पनांवर त्याची सुखात्मता अवलंबून आहे दुःखाच्या त्याच्या कल्पनांवर त्याची शोकात्मता अवलंबून आहे.

विश्वाचा विस्तार केवढा। ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाया केशवसुतांच्या उक्तीप्रमाणे माणसाची विचार करण्याची मूलभूत मर्यादा स्पष्ट होते. सुखदुःखाच्या मर्यादित परिघांत तो वावरतो. त्यामुळे मर्यादित सुखाचा अमर्याद आनंद अनुभवता येतो आणि मर्यादित दुःखाचा कमीत कमी क्लेशकारक अनुभव घेता येतो. सोयीस्कर असो वा नकळतपणाने असो; यात अज्ञानाचा भाग अधिक आहे. पणसत्यअसत्याशी मन केले ग्वाहीअशा कोटीची माणसं स्वात्मशोध आणि जीवनशोध घेत असतात.

मिर्झा गालिब यांची एक फार चांगली गज़ल आहे. ते म्हणतात, ‘जानता हूं सवाबे-ताअत--जुहद। पर तबीयत इधर नहीं आती।।सवाब म्हणजे पुण्य आणि ताअत--जुहद म्हणजे उपासना आणि संयम. म्हणजे, मी परमेश्वराची भक्ती आणि संयमित जीवनाचे पुण्य आणि परिणाम यांचं मोल चांगलं जाणतो. पण मन या गोष्टींकडे जातच नाही. माणसाची ही खरी शोकांतिका आहे. त्याला कळतं पण वळत नाही. ज्ञान आणि कर्मातीलच हा भेद आहे. विचारांनुसार आचार होणं हे खरं समाजसुख असतं.

महाभारतातल्या एका प्रसंगामध्ये दुर्योधनाने असाच एक विचार भगवान श्रीकृष्ण आणि विदुर यांच्यापुढे प्रकट केला आहे. ‘जानामि धर्मं मे प्रवृत्ति: जानाम्यधर्मं मे निवृत्ति:।।याचा अर्थ असा की मी धर्माला पुरेपूर जाणतो; पण धर्माचरणाला प्रवृत्त होऊ शकत नाही. मी अधर्मालाही पुरेपूर जाणतो; पण अधर्माचरणापासून स्वतःला परावृत्त करू शकत नाही. ही अगतिकता आहे आणि अगतिकतेसारखी दुसरी शोकात्म स्थिती नसते. यासाठीमना पाहिजे अंकुश.’ विवेकाचा अंकुश आवश्यक आहे.

माहिती आहे, ज्ञान आहे, पण शहाणपण नाही. विचार आहे पण आचार नाही. सगळे अनर्थ यांमुळे होतात. आणि त्याहूनही खरी शोकांतिका ही आहे की आपल्या शोकात्म स्थितीची आपणास जाणीव होत नाही. स्वस्थता की अस्वस्थता हा खरा प्रश्न आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बीसारखा! द्वंद्वाचा निकाल लावणारा प्रश्न आहे. मी अस्वस्थ आहे म्हणून मी जिवंत आहे.

मी अशा तऱ्हेने जिंवत आहे म्हणून अर्थपूर्ण जगत आहे. दृश्य लौकिक जगणं आणि अदृश्य अलौकिक जगणं यांतील फरक स्पष्ट करणारी ही गोष्ट आहे. भ्रामक आणि वास्तव यांत भ्रामक परवडणारं आहे. वास्तव संत्रस्त करणारं, अस्वस्थ करणारं आहे. पण जगण्याची खुमारी संत्रस्ततेत आहे. - डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 11
Browse Latest Browse All 32