Quantcast
Viewing latest article 1
Browse Latest Browse All 32

सगुण निर्गुण

सगुण निर्गुण ही परमेश्वराची अद्वैती रूपे आहेत. माणूस हा चिन्मय आहे, म्हणजे परमेश्वराचा अंश आहे, म्हणून मानवाची ही अद्वैती रूपं ठरतात. परमेश्वराच्या या रूपांचा विचार करण्याचं एक फार श्रेष्ठ सूत्र तुकोबांनी सांगितलं आहे. ‘देव आहे ऐसी वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।।परमेश्वराचं भजनपूजन हा वैखरीच्या साहाय्याने होणारा व्यवहार हा सगुणोपासनेचा भाग झाला. पण परमेश्वराचे विशिष्ट नामरूपात्मक स्वरूप त्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होणं म्हणजे निर्गुणाचा अनुभव होय. माणसाला आपल्या वर्तनव्यवहारात सगुणनिर्गुणाचा मेळ घालता यायला हवा. आपली नित्यनैमित्तिक कर्मे ही सगुणात्मक बाजू त्या नित्यनैमित्तिक कर्मांना समाजासाठी बांधली जाणारी निष्काम पूजा असं मानलं तसाच वृत्तिपालट घडवून आणला, तर ती निर्गुणात्मक बाजू ठरेल. ‘जयाचिये लिलेमाजि नीती जियाली दिसेया ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे ज्यांच्या साध्या कर्मांनाही नीतीचे अधिष्ठान असते अशा व्यक्ती सगुण-निर्गुणाचे संतुलन साधीत असतात.

कर्माचे निमित्त होणे हा सगुणाचा भाग होय. पण, कर्माचा धनी झाला की सगुण तर हरपतेच पण निर्गुण दृष्टिक्षेपातही येत नाही. नैतिक सत्यातच पारमार्थिक सत्य दडलेले असते. सगुण-निर्गुणाचे संतुलन हे पारमार्थिक सत्य होय. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जी-जी कर्मे येतात ती परमेश्वरार्पण करणे म्हणजे त्या सगुणात्मक कर्मांना निर्गुणात्मक करणे होय. समाजस्वास्थ्यासाठी हा विचार समाजात रुजविणे फार आवश्यक आहे. या विचारामुळे सर्व कर्मांना, म्हणजे सर्व व्यवसायांना, समानता प्राप्त होते ही सर्व कर्मे समाजोन्नतीसाठी सारखीच महत्त्वाची असतात, हा विचार दृढमूल होतो.

कर्मांच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेमुळे कर्मांसंबंधी अहंगंडात्मक तसेच न्यूनगंडात्मक भावना निर्माण होतात. तथाकथित श्रेष्ठ कर्मे आचरणारी माणसं अहंगंडाने पछाडली जाऊन ती अतिरिक्त प्रतिष्ठेची मागणी करतात तथाकथित कनिष्ठ कर्मं आचरणारी माणसं आपली कर्मे समाजासाठी आवश्यक असूनही कनिष्ठ लेखली जातात; त्यामुळे न्यूनगंडाने पछाडली जातात. परिणामतः समाजनामक एकविध घटितात विषमतेची फूट निर्माण होते. विषमताग्रस्त समाज आपले स्वास्थ स्वाभाविकपणे मग गमावून बसतो. मुद्दा असा की, आपली नित्यनैमित्तिक कर्मे समाजासाठी आवश्यक आपल्या चरितार्थासाठी आवश्यक असतात. त्यांचे आचरण केवळ स्वहितासाठी होता ते समाजहितासाठी व्हायला हवे. स्वहितासाठीच कर्मे हा विचार सगुण पातळीवरच रेंगाळतो. म्हणजे असे की अमुक हे कर्म मीच केले हा बंध दृढ होतो. उलट, कर्म केल्यानंतर त्याचा उच्चार करणे इतकेच नव्हे तर त्या कर्माचा मानसिक पातळीवर संन्यास घेणे हा मोक्षानुभव ठरतो. माणसाच्या जगण्याच्या बाबतीत सामाजिक संदर्भात सगुण-निर्गुणाचा विचार फारच उदबोधक ठरू शकतो. साधीसाधी माणसं ज्या निष्काम भावनेने कर्म आचरतात त्यांच्या कृतींमधून जो निर्गुणाचा बोध होतो ती उदाहरणेही यथाक्रम पाहावयाची आहेत. - डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 1
Browse Latest Browse All 32